कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरुच आहे . जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पातळीही चांगलीच वाढली असून महापुराचा धोका जाणवू लागला आहे. येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी शनिवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत प्रत्येक तासाला एक इंच याप्रमाणे वाढत राहिली. पावसाचा जोर पाहता नदीचे पाणी धोका पातळी ओलांडते का?  याकडे लक्ष लागले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीचे पाणी नागरी भागात शिरत आहे. नेहमीप्रमाणे पुराच्या पाण्याचा फटका सुतारवाडा भागाला बसला. याभागातील घरांमध्ये पाणी शिरले. मध्यरात्री नंतर हा प्रकार वाढला. ही स्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिका प्रशासनाने येथील बाधित कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात तीन कुटुंबे मुस्लिम बोर्डिंग येथे स्थलांतर करण्यात आली. तेथे आवश्यक ती औषध, धूर फवारणी केली असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याची माहिती, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ . विजय पाटील यांनी दिली .

महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्थलांतरित कुटुंबीयांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार आरोग्य, अग्निशमन दल, पवडी आणि विभागीय कार्यालये यांनी काम सुरु ठेवले आहे. बाधित कुटुंबियांसाठी महापालिकेच्या जागा, इमारती, शाळा, सभागृह ताब्यात घेतल्या जात आहेत. गरजेनुसार तेथे स्थलांतर केले जाणार आहे. याठिकाणी वीज, पाणी, शौचालय, स्नानगृह आदी सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले .

राधानगरी धरण शनिवारी रात्री किंवा रविवारी भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथून पाण्याचा विसर्ग केला जाण्याच्या शक्यतेने नदीचे पाणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सर्वत पावासाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. गेली पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा जलसंचय वाढत आहे, तर नद्यांचे पाणी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच्या दिशेने जात आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला . शहरात आजही पावसाची उघडझाप सुरूच आहे. डोंगराळ भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तेथे अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात ७४.५० मि.मि. इतका होता . तर अन्य तालुक्यात हातकणंगले १०.६२, शिरोळ ७. १४, पन्हाळा ४२, शाहूवाडी ४९.३३, राधानगरी ४४.६७, गगनबावडा ७४.५०, करवीर २२, कागल १९.५७, गडहिंग्लज १०.४२, भुदरगड २८, आजरा ५१.५० व चंदगडमध्ये ४८.५० मि.मी. अशी एकूण ४०८.२५ मि.मि. पावसाची नोंद झाली.
जिल्हयातील ७२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत . राजाराम बंधाऱ्याची ४१ फूट ३ इंच इतकी पाणी पातळी असून आणखी दोन फुटाने धोका पातळी गाठणार आहे. येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळपासून ते दुपारपर्यंत प्रत्येक तासाला एक इंच याप्रमाणे वाढत राहिली.