विविध नागरी समस्यांवरून इचलकरंजी नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. सुमारे दीड तासाच्या चच्रेनंतर घरोघरी कचरा गोळा करणे, गटारी साफसफाई करणे, कचरा डेपोवर वाहतूक करणे आदी कामे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार हे टीकेचे लक्ष ठरले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.

शहरातील कबनूर वाढीव हद्दीसह २६ वॉर्डातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व तो डेपोवर नेऊन टाकणे या सहा महिन्यांच्या कामासाठी १ कोटी ७१ लाख ७३ हजार रुपयांच्या खर्चाला तसेच ५ वॉर्डातील रस्ते, गटारी साफसफाई व कचरा उठावासाठी ८० लाख ३१ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देणे आणि या दोन्ही कामांसाठी लागणारी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सभा बोलविली होती. सभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी विविध वृत्तपत्रांची प्रलंबित जाहिरात देयके, शिवाजी पुतळ्याजवळील पालिकेच्या गाळय़ांना लावलेला रंग आणि विकासकामांची विविध प्रलंबित देयके याबाबत मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना  धारेवर धरत याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर शहरविकास आघाडीचे गटनेते महादेव गौंड यांनीही वृत्तपत्राची बिले का प्रलंबित राहिली आहे याबाबत प्रश्नाची सरबती केली.

डॉ. रसाळ यांनी विविध वृत्तपत्रांच्या जाहिराती संदर्भात ११ लाख रुपयाची देयके अदा केली आहे. अद्याप सहा लाखांची प्रलंबित आहे. याबाबत उपमुख्याधिकारी डॉ. प्रविण म्हेत्रे यांना अधिकार देण्यात आले असून येत्या पंधरा दिवसात उर्वरित अदा करण्यात येईल असे सांगितले.

पालिकेच्या मालकीच्या गाळय़ांना भाजपच्या पक्षाप्रमाणे लावलेल्या रंगाबाबत संबंधितांना नोटीस लागू केली असून पालिकेतर्फे उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला नसल्याचा खुलासा मुख्याधिकारी यांनी केला.

घनकचरा व्यवस्थापन सेवाकराच्या नावाखाली करण्यात येत असलेला ३६० रुपयांचा कर बेकायदेशीर असून पालिकेच्या सभागृहात प्रतिमहिना २० रुपयांप्रमाणे वार्षकि २४० रुपये कर गोळा करण्याचा निर्णय झाला असून वाढीव कराची रक्कम घेऊ नये अशी जोरदार मागणी ठोके यांनी केली. यावर डॉ. संगेवार यांनी पालिकेच्या ठरावाप्रमाणे कर आकारणी केली असल्याचे स्पष्ट केले.