स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडलेल्या १ कोटी ६७ लाखांची  हवाला रकमेची व्याप्ती वाढत चालली असल्याने सोमवारी त्याचा तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आला आहे. प्राप्तिकर चुकविण्यासाठी छुप्या पद्धतीने हवाला रक्कम नेली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून हा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील तीन कंपन्यांच्या व्यवस्थापकांकडे या रकमेबाबत चौकशी केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून व्ही. आर. एल. कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून बेंगलोरकडे जाणाऱ्या भरत जयंतीलाल पटेल (वय ४६), प्रकाश चर्तुगिरी गोस्वामी (वय ३६३), महेश विक्रमसिंह रजपूत-चव्हाण (वय २३), रमणसिंह शंकरसिंह चव्हाण ऊर्फ रजपूत (वय २५, सर्व रा. सध्या शाहूपुरी, मूळ रा. गुजरात) यांना पकडून  १ कोटी ६७ लाख रुपये जप्त केले होते. शनिवारी रात्री ८ वाजता या चौघांना ही रक्कम कंपनीच्या शाहूपुरी कार्यालयात दिली होती. संबंधित रक्कम गुजरातमधील अहमदाबाद येथील मेसर्स राजेशकुमार सुरेशकुमार अँड कंपनी, एस शैलेश अँड कंपनी आणि पृथ्वी एंटरप्रायजेस या तीन कंपन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी या तिन्ही कंपन्यांच्या मॅनेजरकडे पोलिसांनी चौकशी केली. निकेश जयंतीलाल पटेल (२१, मूळ रा. गुजरात, सध्या रा. शाहूपुरी), अश्विनभाई रामी (५१, रा. सुदर्शन अपार्टमेंट, अहमदाबाद आणि राजेंद्र सोमभाई पटेल (३६, रा. रत्नदीप टॉवर, गाठलोडिया, अहमदाबाद) यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही रक्कम मेंगलोर येथील कंपन्यांच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. या तिन्ही कंपन्या कुरिअर आणि प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. मात्र ही रक्कम कोणाची याबाबत ठोस काही तिघांनीही सांगितले नाही.