कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये नांगरे-पाटील यांच्यासह गाडीतील इतर तिघेजण सुखरुप आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. हा दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईला परतण्यासाठी कोल्हापूर विमानतळाकडे जात होते. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील सरकारी गाडीतून विमानतळाकडे जात असताना हा अपघात घडला. उजळाईवाडी जवळील एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याकडेच्या खड्यात जाऊन पडली. यात नांगरे-पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यासह गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याचे समजते.