कायदा करण्याचा रोशन बेग यांचा पुनरुच्चार

मराठी लोकप्रतिनिधींनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास कारवाई करण्याचा पुनरुच्चार कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी बेळगाव येथे केला. आपल्या भूमिकेशी ठाम राहात त्यांनी अशा प्रकारच्या कारवाईसाठी कर्नाटक शासन याबाबतचे विधेयक आणणार असल्याचे स्पष्ट केले.

रोशन बेग यांनी बुधवारी बेळगाव महापालिकेला भेट दिली. ‘जय महाराष्ट्र’वरील संभाव्य बंदीबाबत सर्व मराठी नगरसेवकांना ताकीद देण्यासाठी त्यांनी महापालिकेत एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीकडे एकही नगरसेवक फिरकला नाही. त्यामुळे बेग यांनी केवळ अधिकाऱ्यांची बठक घेतली. या वेळी त्यांनी ‘जय महाराष्ट्र’वरील बंदीचे समर्थन करताना कर्नाटक सरकार यासंदर्भात कायदा करणारच असल्याचा पुनरुच्चार केला. कर्नाटकात राहून ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. ही घोषणा देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे पद तत्काळ रद्द केले जाईल, असा इशाराही बेग यांनी दिला. दरम्यान, या संभाव्य ‘जय महाराष्ट्र’वरील बंदी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनाबाबत विचारले असता, याबाबत आम्ही महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या कन्नड बांधवांची तसेच परिवहन बसगाडय़ांची काळजी घेण्याची विनंती करणारे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवणार असल्याचे बेग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बेळगावचे महापौर आणि एकीकरण समितीच्या आमदारांनी या प्रश्नी बेग यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांची भेट झाली नाही. या बाबत एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांना विचारले असता लग्न व अन्य भेटींमुळे ही भेट घेऊ शकलो नसल्याचे स्पष्ट केले.