गुटखा धंद्याकडे दुर्लक्ष करत कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबुराव गायकवाड आणि पोलीस नाईक विष्णू रमेश शिंदे या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मर यांनी दिले.

राजू पाच्छापुरे याच्याकडून लाच घेताना पोलीस नाईक विष्णू शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. तसेच पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून ही लाच स्वीकारल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. गायकवाड आणि िशदे या दोघांना आज मोठय़ा पोलीस बंदोबस्तात येथील जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर दोघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांचीही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गायकवाड आणि िशदे यांच्या जामिनाचा अर्ज वकिलांनी सादर केला. त्यावर न्यायालयाने सोमवार २६ सप्टेंबर रोजी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

शिंदे याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने शहरातील नामचीन गुंडांसह अनेक अवैध व्यावसायिकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. या वेळी न्यायालयात जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह नागरिकांना शिंदे समर्थक व पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.