मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आशावाद

कोल्हापूरच्या रखडलेल्या विमानसेवेला उडाण भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बठकीत घेतला असून, पुन्हा एकदा विमानसेवा सुरळीत होण्याची अपेक्षा वाढीस लागली आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे शहरात स्वागत होत असून, कोल्हापूरच्या विकासाला यामुळे गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

कोल्हापुराची विमानसेवा प्रदीर्घ काळापासून बंद आहे. ती पूर्ववत सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. कोल्हापूर येथील विमानतळावरून छोटय़ा विमानसेवा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनप्रसंगी सांगितले होते. संभाजीराजे, धनंजय महाडिक, राजू शेट्टी या तिन्ही खासदारांनी नवी दिल्लीत याला चालना देण्यास सुरुवात केली होती, पण काही ना काही अडचणी येत राहिल्या.

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव्याने सुरू करावयाच्या विमानसेवेबाबत एक बठक घेतली.

त्यामध्ये राज्य शासनाचा विमानतळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात दहा ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये कोल्हापुराचाही समावेश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत होत आहे. याबाबत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शासनाचा हा निर्णय कोल्हापूरच्या विकासाला गती देणारा आहे. केंद्राच्या बरोबरीने राज्याचे विमानतळ प्राधिकरण विमानतळ विकासाला अर्थसाहाय्य करेल, अशी अपेक्षा आहे. छोटी विमानसेवा केंद्रे नफ्यात नसल्याने विमान कंपन्या रस घेत नाहीत. प्राधिकरण विमानतळ माध्यमातून निधी मिळून विमानसेवा सुरू करण्यातील अडचणी दूर होतील, असे ते म्हणाले.