कोल्हापूर विमानतळ उभारणीला गती मिळत असून विमानतळाभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खर्च करून विमानतळाभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. संरक्षक भिंतीचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली असल्याने हे काम लवकर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीसाठी ५० कोटी, तर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. ही दोन्ही कामे मार्गी लागल्यास विमानतळ विकसनाची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्यातील महत्त्वाचे टप्पे पार पडतील, याकडे महाडिक यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मंत्री राजू यांनी दोन्ही कामांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला. मंत्री राजू यांनी प्रशासकीय पातळीवर या कामाला गती दिली आणि प्रत्यक्ष निधीही उपलब्ध करून दिला. दोन्ही कामांपकी संरक्षक भिंत बांधकामाची १६ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे.