मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुण्याच्या विमानतळास छत्रपती संभाजीमहाराजांचे नाव देण्याच्या घोषणेपाठोपाठ कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराममहाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये राज्य सरकार हिस्सा उचलणार असल्याचे अधिकृत पत्रही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. खासदार संभाजीराजे या वेळी उपस्थित होते.

कोल्हापूर विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराममहाराज यांनी केली. या  विमानतळास छत्रपती राजाराममहाराजांचे नाव देण्यासंदर्भात यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली तसेच उपोषणे व आंदोलने कोल्हापूर नगरीत झाली. यापूर्वीच्या सरकारकडे तशी अनेकदा मागणी करण्यात आली होती. पण या मागणीला आजवर वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या. कोल्हापूर विमानतळ आधुनिकीकरण आणि अन्य मुद्दय़ांच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी वरील नावाची लगोलग घोषणा केली. खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत करत गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याचे सांगितले.