कोल्हापूर हद्दवाढीचा तिढा

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कोल्हापूर प्राधिकरणाचा प्रस्ताव म्हणजे, विकासाचा सुवर्णमध्य ठरेल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूरच्या विकासासाठी प्राधिकरण म्हणजे नेमके काय याची माहिती देण्यासाठी केशवराव भोसले नाटय़गृहात पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी  खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, नगर विकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर शमा मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी दिलेला हा कोरा धनादेश असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील यांनी महानगर विकास प्राधिकरण, क्षेत्र विकास प्राधिकरण यापकी प्राधिकरणाचे कोणते प्रारूप निवडायचे याबाबत सूचना आणि हरकती आल्यावर एक महिन्यात जिल्हाधिकारी अहवाल तयार करतील, तो अहवाल जनतेसाठी खुला करण्यात येईल, असेही पालकमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरचा विकास साध्य करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाचा दिलेला पर्याय अतिशय चांगला आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून संतुलित विकास साध्य होईल.  राजेश क्षिरसागर म्हणाले, विकासाचा हेतू प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चितपणे साध्य होण्यासाठी प्राधिकरणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा. महापलिकेच्या स्वायत्ततेला धक्का लागू नये. आमदार  मिणचेकर म्हणाले, प्राधिकरणमुळे शहराला विकासाची एक वेगळी दिशा मिळेल. ग्रामीण भागाचा बाज आबाधित ठेवून विकास साध्य होईल.

एन. आर. शेंडे म्हणाले, कोणताही त्रास न होता नियोजनबध्द विकास हे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. निर्णयप्रक्रिया अतिशय जलद राबविली जाऊन गतिमान विकासाची अपेक्षा साध्य होऊ शकते. सुहास दिवसे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राचा नियोजनबध्द विकास हे िपपरी-चिंचवड प्राधिरणाचे यश आहे. प्राधिकरणाचे योग्य प्रारूप स्वीकारून कोल्हापूर राज्यात आदर्श निर्माण करू शकेल.

कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सादर करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या माहितीवर एक महिन्यात सूचना, मते मांडली जातील, कालबध्द विकासासाठी शहराचा विकास झाला पाहिजे, असे सांगितले. हद्दवाढ विरोधी कृती समितीचे निमंत्रक नाथाजी पवार यांनी हद्दवाढीबद्दल ग्रामीण भागातील जनतेचे मत घेणे आवश्यक असल्याचे सांगून ग्रामीण जीवनावरती परिणाम न करता विकास साध्य करू शकणारे प्राधिकरण ग्रामीण भागात समजले पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.