कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस कोल्हापूरातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, २७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाला आहेत. आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाशी चर्चा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निकालानंतर सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरातील नेते हसन मुश्रीफ यांनीही आम्ही नैसर्गिक मित्रपक्ष काँग्रेससोबतच राहू. मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे म्हटले आहे.
भाजपच्या नेतृत्त्वाखालील स्थानिक ताराराणी आघाडीला ३२ जागांवरच यश मिळाले आहे. महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या ४१ जागांपासून ते दूरच राहिले आहेत. यामध्ये भाजपकडे १२ तर ताराराणी आघाडीकडे २० जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागांवर तर शिवसेना ४ जागांवर विजयी झाले आहेत. तीन जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी रविवारी तब्बल ७० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
कसबाबावडामध्ये काँग्रेसच्या सतेज पाटील गटाने बाजी मारली असून, तेथील सातही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २५ मधून ताराराणी आघाडीच्या पूजा नाईकनवरे विजयी झाल्या असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांचा पराभव केला. माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे यांचे पती प्रकाश नाईकनवरे यांनाही पराभव सहन करावा लागला असून, त्यांची सून पुजा नाईकनवरे विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे गटनेते श्रीकांत बनसोडे यांनादेखील पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनीही विजय मिळवला आहे.
अंतिम पक्षीय बलाबल
काँग्रेस – २७
ताराराणी आघाडी – २०
राष्ट्रवादी काँग्रेस – १५
भाजप – १२
शिवसेना – ४
अपक्ष – ३