कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी टोल वसुलीस स्थगिती दिली नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोल रद्द करण्याबाबत दिलेला शब्द पाळण्यासाठी व कोल्हापुरातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द करु, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. टोल रद्द  केल्यानंतर महापालिकेवर कसलाही बोजा पडणार नाही याची दक्षता राज्य सरकार घेईल असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शिवसेनेचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, टोलबाबत येथील जनतेच्या भावना तीव्र होत्या. टोल विरोधी कृती समितीच्या आंदोलनाची व्यापकता मोठी होती. त्याचे लोण महाराष्ट्रभर पसरले. कामाच्या मूल्यांकनाबाबत दोन समित्या नेमण्यात आल्या. दिलेल्या अहवालातील खर्चाच्या तपशीलात तफावत आहे. पण कोल्हापूरच्या जनतेचा पसा वाया जाऊ देणार नाही. तसेच ठेकेदार आय.आर. बी. कंपनीकडून कामामध्ये कराराचा भंग असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करु पण जनतेनी विश्वास बाळगावा. सध्या तीन महिन्यासाठी स्थगित केलेली टोल वसुली कायमस्वरुपी रद्द करु. टोलबाबत राज्य सरकार गंभीर असून कंपनीला किती पसे द्यायचे, दिलेल्या भूखंडाची किंमत वजा करायची पण महापालिकेवर बोजा पडणार नाही याची दक्षता सरकार घेईल. त्यानंतर या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीही सरकार आíथक तरतूद करेल.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना सरभर झाल्याच्या राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेबद्दल त्यांना विचारले असता, तेच आता सत्तेबाहेर असल्याने सरभार झाले असल्याचा पलटवार करुन शिवसेना वादळातही आपल्याविचारांशी बांधील आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहराच्या सर्वागीण विकासाचा वचननामा आम्ही देणार असून कॉंग्रेस, राष्ट्रवादीच आमचा प्रमुख विरोधक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीनंतर युती करण्याबाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. या वेळी आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदि उपस्थित होते.