विमानसेवा, पंचतारांकित हॉटेल अशी ऐशोआरामी सुविधा उपलब्ध न झाल्याने कुलगुरुंनी येथे आयोजित केलेल्या कुलगुरु परिषदेकडे पाठ फिरविली. साधी राहणी, उच्च विचारसरणीचा घोषा लावणा-या कुलगुरुंना प्रत्यक्षात ऐश्वर्य संपन्न सुविधांचा मोह पडल्याचे दिसून आले आहे. कुलगुरुंना शैक्षणिक विचार मंथनात अधिक रस आहे की राजेशाही थाटात, असा प्रश्न या निमित्ताने उद्भवला आहे. कुलगुरुंच्या ऐशोआरामी वागणुकीचा फटका कोल्हापुरातील खंडपीठ मागणीला बसण्याचीही भीती आहे.
येथील शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी गेले काही दिवस विद्यापीठाची मोठी यंत्रणा राबत होती. वेगवेगळे विभाग करुन त्यांच्याकडे जबाबदा-या सोपवण्यात आल्या होत्या. ही यंत्रणा बारकाईने काम पाहते की नाही, याचा आढावाही घेतला जात होता. त्यासाठी विभागातील कुलगुरुंशी संपर्कही साधला गेला होता. त्यानुसार संबंधित सर्व कुलगुरुंची उपस्थिती परिषदेला लागेल, असा विश्वासही संयोजकांनी परिषदेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला होता.
प्रत्यक्षात परिषदेचे उद्घाटन झाल्यापासून ते त्याचे सूप वाजेपर्यंतचा प्रवास पाहिला तर कुलगुरुंची अपेक्षित उपस्थिती नसल्याचे दिसून आले. कुलगुरुंची संख्या कशामुळे रोडावली गेली, असा प्रश्नही खुद्द संयोजकांनाही पडला होता. त्याची कुजबूजही विद्यापीठ परिसरात सुरु होती. त्यातून पुढे आलेली माहिती कुलगुरुंची शिस्त, विचारसरणीला धक्का देणारी असल्याचे आढळले. अनुपस्थित राहिलेल्या अनेक कुलगुरुंनी कोल्हापूरला विमानसेवा, पंचतारांकित सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले असल्याचे समजते.
वास्तविक भारताची संस्कृती ही ग्रामीण पाश्र्वभूमीची आहे. विद्यापीठांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीच संख्या अधिक आहे. खेडय़ा-पाडय़ातील या विद्यार्थ्यांना केंद्रीभूत मानून विद्यापीठाचे कामकाज केले जाईल, असा घोषा सर्वच कुलगुरुंकडून लावला जातो. मात्र, त्यांची उक्ती आणि कृतीमध्ये किती मेळ आहे हे कुलगुरु परिषदेच्या निमित्ताने दिसून आले आहे. केवळ विमान, आधुनिक सुविधा नसल्याने परिषदेकडे पाठ फिरवणा-या कुलगुरुंची शिक्षणाप्रति किती आस्था आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
तर दुसरीकडे विमानसेवा नसल्याने कोल्हापूरला गौण स्थान देण्याची कुलगुरुंची भूमिका कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीच्या मुळावर येणारी आहे. कोल्हापूरला खंडपीठ न देण्याच्या यादीमध्ये येथील विमानसेवेचा अभाव हे प्रमुख कारण आहे. कुलगुरुंनी हेच कारण पुढे केल्याने खंडपीठ मागणीच्या आंदोलनाला ते बाधा आणणारे असल्याने कुलगुरुंच्या भूमिकेविषयी करवीर नगरीत कडवट प्रतिक्रिया उमटत आहेत.