मंदिर परिसरात सापडलेले कासव कळंबा तलावात सोडणार

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात स्वच्छता करण्यात गुंतले होते. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आघाडीवर राहून मंदिर परिसरातील अस्वच्छता दूर करून परिसर चकाचक करण्याचा प्रयत्न केला.

महालक्ष्मी मंदिर परिसरात उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जात आहे. त्याला आज आणखी एक नवी जोड मिळाली ती लोकप्रतिनिधी व  वरिष्ठ अधिकाऱ्यांची. आज राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला मंदिराच्या आवारातील उत्तर दरवाजाजवळ असणाऱ्या जनरेटर रूमजवळील गटारीपासून सुरुवात केली. डॉ. सनी आणि  देशपांडे यांनी जुन्या वायिरगखाली असणारी घाण स्वच्छ केली.

पाहता पाहताच स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी जमा झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी हातात झाडू, सुपल्या, कचराकुंडय़ा घेऊन मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात केली. महालक्ष्मी उद्यानाजवळील साचलेल्या झावळय़ा, गवत, कचरा, पालापाचोळा स्वच्छ केला गेला. नगारखाना स्वच्छ केला. मंदिर परिसरातील दुकानांखालील असणारा कचरा काढला, संपूर्ण मंदिर या वेळी स्वच्छ करण्यात आले. मंदिराच्या आवारातील स्वच्छतेदरम्यान सापडलेले कासव कळंबा तलावात सोडण्यासाठी देण्यात आले. प्रशासनातर्फे ही स्वच्छता मोहीम राबवली जात असतानाच दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सनी यांच्या हस्ते नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या महिलांसाठी मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आयसीआयसीआय बँकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटनही करण्यात आले.  नवरात्रोत्सव काळात मंदिर आणि परिसरात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय काटेकोरपणे पाळला जावा यासाठी प्रशासनाच्या वतीने भाविक आणि दुकानदारांना आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीला दुकानदारांनीही सहमती दिली असून, प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे १० हजार पिशव्या दुकानदारांना वितरित करण्यात आल्या.