ध्वजारोहण, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार, पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्र राज्याचा ५६वा स्थापनादिन शहरात ध्वजारोहण, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार, पुरस्कारांचे वितरण अशा विविध उपक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गायन व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात पोलीस दल, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना, बँड पथक, अशा विविध विभागांची पथके सहभागी झाली होती. शालेय मुला-मुलींनी समूहगान सादर केले.
राज्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानातून ५ वर्षांत ३३ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून गावोगावी शाश्वत जलसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात केले. कोल्हापूरची टोलमुक्ती करून शासनाने वचनपूर्ती केली आहे. या टोलमुक्तीसाठी शासनाने ४५९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हय़ातही रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला असून, जवळपास साडेतीनशे कोटीची कामे जिल्हय़ात आणली आहेत.
विविध पुरस्कारांचे वितरण
या वेळी सन्य दलात कार्यरत असताना आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने अपंगत्व प्राप्त झालेल्या जवान आदम शमसुद्दीन आतार, जवान रमेश दत्तात्रय माने यांना शासकीय आíथक मदतीचे धनादेश पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पोलीस महासंचालक मुंबई यांचे सन्मानचिन्ह पुरस्कार कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत, गुप्त वार्ता विभागाचे गुप्त वार्ता अधिकारी शिवाजी शंकर शिंदे, चंदगडचे पोलीस उपनिरीक्षक शरद नारायण माळी, व्हाइट आर्मी पुरस्कार डॉ. आकाश संतोष प्रभू, प्रशांत प्रकाश शेंडे, शर्वरी अशोक रोकडे यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बग्रे, उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संजय पवार आणि स्वाती देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे उपस्थित होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे करवीरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्याचा स्थापनादिन शिवाजी विद्यापीठात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संगीत व नाटय़शास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.