जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर सत्तेचे वेध लागलेल्या  राजकीय पक्षांनी निकालाच्या पूर्वसंध्येला सत्ताप्राप्तीची समीकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांनी आमचीच सत्ता येणार असा दावा केला असला तरी कोणा एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता अंधूक आहे. तथापि, जिल्हा परिषदेच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसला मतदान चांगले झाल्याने हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकण्याची चिन्हे असली तरी त्यांना सत्तेसाठी राष्ट्रवादीची साथ मिळणे गरजेचे आहे. तर भाजपनेही मोठी ताकद लावल्याने त्यांच्याही जागा लक्षणीय प्रमाणात वाढणार असल्या तरी सत्ता मिळवण्यासाठी त्यांना मुसंडी मारू पाहणाऱ्या शिवसेनेची सोबत लागेल. शिवसेना राज्यात जी भूमिका घेईल त्याचे पडसाद कोल्हापुरात पडणार आहेत. त्यामुळे मतांचा अंतिम कौल हाच सत्तेवर प्रकाशझोत टाकणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी ७७ टक्के मतदान झाले. मतांची टक्केवारी वाढली आहे. वाढलेली मते कोणाकडे, कशी वळली यावर निकाल अवलंबून असेल. तरीही मिनी मंत्रालयावर नेमका  झेंडा कोणाचा फडकणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मतदानानंतर निकालाचा कल साधारण कसा राहील याचे आडाखे मांडताना तो दोन्ही काँग्रेसच्या बाजूने जाताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावणाऱ्या काँग्रेसच्या जागांत कपात होईल, पण त्यांना १८ ते २० जागा मिळतील. सत्तेत त्यांना यायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत लागेल. या पक्षाच्या  १२ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपने मोठय़ा प्रमाणात वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळे त्यांचे बळ वाढण्याची चिन्हे आहेत. कमळ १५पेक्षा अधिक ठिकाणी फुलेल, असे दिसते. पण त्यांना मिनी मंत्रालय कब्जात घ्यायचे असेल तर मुसंडी मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेची सोबत गरजेची ठरेल. सेनेचे डझनाहून अधिक सदस्य विजयी होण्याची शक्यता दिसते. जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, २-३ स्थानिक आघाडी फार मोठी झेप घेणार नसल्या तरी काठावरच्या सत्तेच्या तराजूत त्यांच्या  दोन-चार जागाही सत्तेचे समीकरण बदलू शकतात.