आयारामांच्या बळावर भाजपला यश तर दोन्ही काँग्रेसची पीछेहाट; स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपेक्षित यश नाहीच

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील गटबाजी कायम राहिल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता पुन्हा प्राप्त करणे हे दिव्य बनले आहे. या उलट भाजपने आयारामांच्या जोरावर आणि नव्याने जोडलेल्या मित्रपक्षांच्या जिवावर सत्ताप्राप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. उभय काँग्रेसला ताकद एकवटूनही एकहाती सत्तेचे गणित कसे चुकले याचे चिंतन करण्यास भाग पाडणारा हा निकाल आहे. सत्ता कोणाची याचे उत्तर मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाचा वेध घेणार यावर ठरणार आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ताज्या दौऱ्यानंतरही सत्तेचे त्रांगडे सुटण्याची चिन्हे नाहीत. मुंबई महापालिकेतील सत्तेचा सारीपाट कसा आकार घेणार यावर शिवसेनेचे धोरण आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण जमणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्य़ांप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व राहिले आहे. या मिनी मंत्रालयाचा कारभार गतिमान, पारदर्शक, लोकाभिमुख वगरे करण्याचे आश्वासन देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्या बदलाची ग्वाही ग्रामीण जनतेला दिली. खेरीज, दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना भाजपत प्रवेश देत पक्ष ग्रामीण भागात मजबूत करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. जोडीला गतिमान, सांघिक प्रचाराची जोड देतानाच कशाची म्हणून उणीव राहता कामा नये याची काळजी घेतली. वातावरण असे काही भरून टाकले की दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची मती गुंग झाली.

बदलते वातावरण पाहून आणि महाडिक कुटुंबाची ताराराणी आघाडी, माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष, राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांची चंदगड विकास आघाडी, राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांची तालुका विकास आघाडी आदींची भरभक्कम साथ मिळाल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६७ पकी ५० जागा जिंकणार असा अंदाज वर्तवला. तो अवाजवी असल्याचे निकालाने दाखवून दिले असले तरी सध्या भाजप हाच मित्रपक्षांना घेऊन सत्तासोपान गाठेल असे चित्र आहे. याला पालकमंत्र्यांचे प्रयत्न जसे कारणीभूत, तशी दोन्ही काँग्रेसची निवडणूकपूर्व आणि नंतरची गटबाजीही आहे.

काँग्रेसला धक्का

निवडणुकीचे वातावरण सुरू झाल्यापासूनच दोन्ही काँग्रेसमध्ये जोश, ईर्षां, लढाऊ बाणा याचा अभाव होता. उलट गटबाजी होती. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघापुरते पाहण्याची लघुदृष्टी खुद्द नेतृत्वात होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मतदारसंघाच्या पलीकडे पाहिले नाही. जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे हे दोन्ही माजी मंत्री त्यांच्या तालुक्यात एकमेकांची जिरवत बसले. त्यात आवळे अगदीच पिछाडीवर पडले, तर स्वतंत्रपणे लढत आवाडे यांनी आपला गड शाबूत ठेवला. ते काँग्रेसकडून लढले असते तर अपयशाने पाठ सोडली नसतीच. नाही म्हणायला आमदार सतेज पाटील हेच काय ते एकाकी झुंज देत राहिले.

राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार  के. पी. पाटील यांना मतदारसंघाच्या पल्याडचे काही दिसले नाही. तर या पक्षाचे खासदार धनंजय महाडिक हे ऐन निवडणुकीत तटस्थ राहिले. राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्याने पक्ष उतरणीला चालल्याचे दिसून आले. आता मुश्रीफ यांनी त्यांच्यावर भाजप-ताराराणी आघाडीला मदत केल्याचा आरोप करतानाच त्यांना थेट भाजपत जाण्याचा सल्ला दिल्याने पक्षांतर्गत गटबाजी आणखी उफाळली आहे. दोन्ही काँग्रेसमधील गटबाजी आणि खालावलेले संख्याबळ पाहता ते सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत नाहीत.

स्वाभिमानीची पडझड

भाजपवर हल्ला चढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय फारसा फलदायी ठरला नाही. त्यांच्या शिरोळ या बालेकिल्ल्यासह जिल्ह्य़ात यशाने हुलकावणी दिली. केवळ दोन जागांवर उमेदवार विजयी झाले असले तरी आता सत्तास्थापनेसाठी ही अल्प मतेही भलतीच मोठी ठरली असल्याने पडझड होऊनही स्वाभिमानाला महत्त्व कायम आहे. आताचे अपयश हे शेट्टी यांना लोकसभेसाठी धोक्याचे ठरण्याची चिन्हे असल्याने त्यांना रणनीतीत लक्षणीय बदल करावा लागणार आहे.

जिल्ह्य़ात सर्वाधिक सहा आमदार असतानाही शिवसेनेला अवघ्या दहा जागा मिळाल्याने सेनेची मोठी नामुष्की झाली आहे. निम्मे आमदार, सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक हे अपयशी ठरले आहेत. भाजप असो की दोन्ही काँग्रेस यांना काहीही केले तरी शिवसेना सोबत आल्याशिवाय सत्तासोपान गाठता येत नाही. यामुळेच उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला असला तरी त्यांना ठाकरे यांना कोणताच ठाम शब्द दिला नाही. मुंबई महापालिकेत घडेल त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटणार आहेत. मातोश्रीचे कृपादान हेच सत्तेचा कौल ठरवणारे आहे.

untitled-13