मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात विलंब होत असल्याने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात तीसहून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले . गोकुळ शिरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने पुणे – बेंगलोर मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या मोठय़ा रांगा  लागल्या होत्या . परवानगी नसताना आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला असला तरी त्याला प्रतिसाद मात्र खूपच अल्प होता.

राज्यभर निघालेल्या क्रांती मोर्चानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी एक समिती नेमली होती. पाच महिन्यानंतरही या समितीकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे ३१ जानेवारीला चक्का जामचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार शहर व जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या चक्काजाम आंदोलनात मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते .  आंदोलनाची दखल घेत मोठा पोलीस फौजफाटा तनात करण्यात आला होता. कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या चक्काजामला सकाळी सुरुवात झाली . शिरोली नाका येथे भगवा  झेंडा घेतलेले कार्यकत्रे जमा झाले . त्यांनी रस्त्यावर ठाण  मांडून रास्ता रोको केला . अशाच प्रकारची आंदोलने  जिल्ह्यातील महत्वाच्या शहरात व तालुका स्तरावर  शांततेत पार पडली.   दुहीचा परिणाम, जिल्हा परिषद निवडणूक नी  पोलिसांचे नियोजन जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्का जाम करण्याचे नियोजन असताना त्याला काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे . यामुळे एकरुप झालेल्या सकल मराठ्यांच्यातील चक्का जामवरुन समाजात  दुफळी निर्माण झाल्याने मोठी उपस्थिती लागली नाही . तसेच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने नेते , इच्छुक यांच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे दिसले . तर , काही ठिकाणी आंदोलन स्थळाकडे जाणारी वाहने पोलिसांनी दूरवर रोखली वा  ती अन्य मार्गानी वळवली. त्यामुळे चक्काजाम करायचा कसा, असा प्रश्न आंदोलकांना पडला.