सध्या चांगले शिक्षण महागले आहे. शेतकरी, रिक्षाचालक, कष्टकऱ्यांची मुले कशी शिकणार हा गंभीर प्रश्न आहे. भारताचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यात स्त्री शिक्षणाची भूमिका अधिक महत्त्वाची असणार आहे. इंग्रजीपेक्षा मातृभाषेतील शिक्षण उत्तम असते हे वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

येथील ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे आयोजित व्याख्यानात ते ‘स्त्री शिक्षणाची वाटचाल’ या विषयावर बोलत होते. प्रा. पवार म्हणाले,गरिबांची मुले-मुली शिक्षणापासून वंचित रहात आहेत. मराठी शाळा म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाची केंद्रे आहेत. या शाळा वाचवणे गरजेचे आहे. मेरी कोम, हरियाणातील कुस्तीपटू गीता व बबिता, मणिपूरमधील अ‍ॅथलेटिक शर्मिला यांच्या जीवनातील उदाहरणे त्यांनी दिली. पी. आर. मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भारती शेळके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस. डी. चव्हाण यांनी आभार मानले.