चलन तुटवडय़ाच्या निषेधार्थ मोर्चा

जिल्ह्यातील चलन तुटवडय़ाने निर्माण झालेल्या जनआक्रोशाला सोमवारी निघालेल्या मोर्चाने वाचा फोडली. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शहरातील चारही करन्सी चेस्ट बँकेचे प्रतिनिधी व जिल्हा बँकेचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बठक घेऊन बँकांच्या शाखेच्या सम प्रमाणात उपलब्ध रोकड वाटण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी जिल्हाधीकारी नंदकुमार काटकर यांनी दिले .

जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सहकारी बँकांना पुरेसा चलन पुरवठा व करन्सी चेस्ट बँकांच्या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व संलग्न सहकारी संस्था तसेच नोटा व रोकड बंदी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन काटकर यांना देण्यात आले. या वेळी झालेल्या बठकीमध्ये ११ नोव्हेंबरपासून करन्सी चेस्ट बँकांनी कोणत्या कोणत्या बँकांना किती रोकड दिली याचा तपशील बँकांनी दोन दिवसात प्रशासनास देण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला.

दसरा चौकातून निघालेला भव्य मोर्चा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने काटकर यांची भेट घेतली. करन्सी चेस्ट बँकांकडून जिल्हा बँक व इतर सहकारी बँकांना रोकड देताना दुजाभाव केला जातो. यामुळे खातेदारांचे जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तत्काळ सहकारी बँकांना पुरेसा चलन पुरवठा करावा, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.

चलन तुटवड्याबाबत करन्सी बँकांनी धोरण न बदलल्यास बँकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी दालनातून बाहेर सोडणार नाही . पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या या निर्णयाने देशात सध्या अराजकता माजली आहे. येत्या चार दिवसांत जिल्ह्यातील चलन तुटवडा सुरळीत न झाल्यास शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, अंगणवाडी कर्मचारी, पेन्शनर यांच्या हक्कासाठी प्रसंगी जिल्हा पाडू,  असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

काटकर यांनी , ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकारी बँकांची अडचण सांगितली आहे. सहकारी बँकांच्या जिल्ह्यातील ४१ शाखांमध्ये १५ लाख ग्राहक यांना पुरेसा चलन पुरवठा करावा, अशी मागणी केल्याचे सांगितले.

यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडून जिल्ह्यातील करन्सी चेस्ट बँकांना किती चलन आले , त्याचे वाटप कसे केले याचा तपशील द्यावा अशी मागणी केली. कामगार नेते अतुल दिघे यांनी दररोज ४ बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी यांची बठक घ्यावी अशी मागणी केली. संचालक भय्या माने यांनी सहकारी बँका बंद पाडण्याचे षडयंत्र सरकारच्या वतीने सुरु असल्याचा आरोप केला.