डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन असल्याने महापौर, उपमहापौरपदांच्या निवड कार्यक्रमाचा दिवस बदलावा, अशी विविध संघटनांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली असून, यामुळे गुरुवारी या निवडी होणार आहेत. महापालिका पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

महापौर, उपमहापौरपदांचा निवड कार्यक्रम गेली काही दिवस चच्रेत आहे. काँग्रेस पक्षाच्या  महापौर अश्विनी रामाणे व राष्ट्रवादीच्या उपमहापौर शमा मुल्ला यांनी राजीनामा दिला आहे. रिक्त झालेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली.

ही निवड ६ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभेत घेण्याचे ठरले होते. मात्र या दिवशीच डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाणदिन असल्याने महापौर निवड  व पर्यायाने त्यातून होणार जल्लोष टाळला जावा, अशी कार्यक्रमाचा दिवस बदलावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली. याबाबत महापालिकेने विभागीय आयुक्तांना कळवले. त्यांनी  जनतेतून होणाऱ्या मागणीचा विचार करून या निवडी गुरुवारी (८ डिसेंबर) सकाळी ११ वाजता करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी होणार आहेत.

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून महापौरपदासाठी हसीना फरास आणि उपमहापौरपदासाठी अर्जुन माने यांचा अर्ज दाखल केला आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने महापौरपदासाठी स्मिता माने, कविता पागर, मनीषा कुंभार आणि उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे, गीता गुरव, विजयसिंह खाडे-पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत.