साडेतीन मुहूर्तापकी एक असलेला गुढीपाडवा ग्राहकांना सोने खरेदीअभावी पार पाडावा लागणार आहे. कारण उद्या (शुक्रवार) दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध करण्याचा ठराव सराफ व्यावसायिकांच्या गुरुवारी झालेल्या बठकीत घेण्यात आला.
सराफी व्यवसायाला अबकारी कर आकारून आज ३५ दिवस झाले. त्याचा व्यावसायिकांतर्फे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निषेध केला जात आहे. आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुढीपाडव्याला दुकाने सुरू करायची की नाही या संदर्भात बठक आयोजित केली होती. दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी कारागीर संघटनेच्या वतीने पुन्हा पत्र देण्यात आले. परंतु सर्व सराफ व्यावसायिकांनी याला विरोध करीत दुकाने बंदचा निर्णय घेतला. हुपरी येथील चांदी व्यावसायिक संजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेश राठोड, मनोज राठोड, सुरेश ओसवाल, बाबुराव जाधव, सुनील मंत्री, दिनकर ससे, माणिक जैन, बन्सी चिपडे, धर्मपाल जिरगे, जितेंद्रकुमार राठोड, शीतल पोतदार, बाबा महाडिक, संपतराव पाटील, सुभाष भारती, नगरसेवक किरण नकाते, सुहास जाधव, प्रकाश बेलवलकर, तेजपाल शहा, राजेंद्र शहा, सुहास शहा, सुभाष पोतदार, रवींद्र लांडगे यांच्यासह मोठय़ा संख्येने सराफ व्यावसायिक उपस्थित होते.
सण असल्याने एखाद-दुसरा सराफ व्यावसायिक दुकान सुरू करेल, त्याला सर्वानीच विरोध केला आणि बठकीत सर्व संचालकांसह १५० जणांची टीम नेमण्यात आली. या टीमने आपापल्या भागातील दुकाने बंद ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. पूर्ण जिल्हाभर स्थानिक पातळीवर संघटनेचे पदाधिकारी आपापल्या ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असेही यावेळी ठरले. शिवाय कोणी व्यावसायिकाने या दिवशी दुकान सुरू ठेवले तर त्याला जागच्या जागी ११ हजार रुपये दंड करण्याचा ठरावही यावेळी सर्वानुमते करण्यात आला.