विधानसभेतील आमदारांच्या अंदाज समितीने टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासह हणबरवाडी-धनगरवाडी सिंचन योजनेची पाहणी करताना, या संदर्भात संबंधित प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी गरजेच्या तुलनेत अगदीच अल्प  प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे नमूद केले. आमदार अनिल बाबर यांनी या प्रकल्पाचे एकंदर काम पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३०० कोटी याप्रमाणे ३ वष्रे निधीची तरतूद व्हावी अशी मागणी केली.
सातारा जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानसभेतील १० आमदारांच्या अंदाज समितीमधील अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, सदस्य आमदार मिलिंद माने, बाळासाहेब मुरकुटे, नरेंद्र जगताप, शशिकांत खेडेकर, धर्यशील पाटील या सात आमदारांनी जलसिंचन योजनांची पाहणी केली. या दौऱ्यात समिती सचिव अशोक मोहिते यांच्यासह सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्यासह जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कराड तालुक्यातील हणबरवाडी-धनगरवाडी पाणी योजनेची पाहणी केली. या योजनेबाबत शासनाच्या अपूर्ण कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे बाळासाहेब पाटील व संबंधित अधिकाऱ्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी अधीक्षक अभियंता गुणाले यांनी प्रकल्पाच्या मंजुरीपासून झालेली निधीची तरतूद आणि प्रकल्पाचा आराखडा याविषयी माहिती दिली. यावेळी समितीने प्रकल्पाच्या पंपहाऊससह सर्व विभागाची पाहणी केली. यावेळी या प्रकल्पाला पूर्वी सुमारे १५० कोटींची तरतूद झाली असून, पूर्वीच्याच कामाचे जवळपास ४० कोटी रुपये देणे बाकी असल्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणखी भरीव निधीची तरतूद करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी अनिल बाबर व बाळासाहेब पाटील यांनी या प्रकल्पासाठी तीन वर्षांत ९०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली.