डाव्या आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असे खासदार सीताराम येचुरी म्हणाले

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ‘चक्रव्यूहात भारतीय लोकशाही’ या विषयावर ते बोलत होते. येचुरी म्हणाले, की देशाच्या विकासाचा दर तथा जीडीपी हा उद्योग, उत्पादन, शेती आणि सेवा क्षेत्रातील प्रगतीवर अवलंबून असतो; मात्र या सर्वच क्षेत्रात सरकारला घाटा होत असतानाही हे सरकार ७.२ विकासदर असल्याचे सांगत आहेत. उत्पादन घटले आहे. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना दीडपट भाव देण्याची घोषणा करणारे शेतकऱ्यांना फसवत आहेत. त्यामुळे आत्महत्या वाढल्या असून गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले आहे. डाळीचे भाव हे २०० रुपये किलो झाले आहेत. देशातील शेतकऱ्यांकडून ५० रुपये ५० पसे दराने डाळ विकत घेणाऱ्या सरकारने विदेशातून १५२ रुपये प्रतिकिलो दराने डाळ विकत घेतली आहे

येचुरी म्हणाले, राज्यसभेत संख्याबळ कमी असल्याने मनी बिलाच्या नावाखाली लोकसभेची मोहोर उठवून संविधान बदलण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. काश्मीर प्रश्न धगधगत ठेवण्यात सरकारला स्वारस्य आहे.

वारंवार चर्चा करा, असे सांगूनही हे सरकार त्या दृष्टीने पावले न उचलता केवळ तोंडाची वाफ दवडत आहे. चक्रव्यूह भेदायचा असेल तर शेतकरी, कष्टकरी, डाव्या आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभारले पाहिजे.  पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट बांधवांसाठी महाराष्ट्रातून सुमारे दहा लाखांचा निधी येचुरी यांच्याकडे देण्यात आला.