महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावणी पूर्ण होऊन गुन्हा घडल्यापासून केवळ अकरा दिवसांत शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील (रा. आढाववाडी ता. पन्हाळा) याला २ वष्रे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड करण्यात आला असून दंडाची रक्कम पीडित महिलेला अदा करण्यात यावी, असा आदेश कळे  येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मिलिंद तोडकर यांनी मंगळवारी दिला. महिलांचा विनयभंग, छेडछाड, बलात्कार अशा घटना वाढत असताना पोलीस प्रशासन आणि न्यायालयाने ही घटना संवेदनशीलपणे हाताळत अल्प काळात आरोपीला शिक्षा सुनावल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी व तक्रारदार महिला एकाच गावात राहतात. आरोपी पाटील याने तक्रारदार महिलेचा हात पकडून विनयभंग  करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद आल्याने गुन्हा दाखल झाला होता. आरोपीस अटक करून ९ सप्टेंबर रोजी दोषारोप पत्रासह १२ तासांचे आत न्यायालयात दोषारोप पत्रासह हजर केले होते. आरोपीवर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तसेच जुना राजवाडा पोलिस ठाणात अदखलपात्र गुन्हा नोंद आहे.

या अपराधाबद्दल माहिती मिळताच कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी बिट अंमलदार इरफान गडकरी यांना तपासाचे आदेश दिले. महिला अत्याचार प्रतिबंधक गुन्हा असल्याने गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील   यांनी देसाई, गडकरी, संदीप पाटील, सर्जेराव पाटील यांचे तात्काळ पथक करून साक्षीदारांचे जबाब, पंचनामे वगरे बाबींची पूर्तता करून बारा तासांत दोषारोप पत्र सादर केले होते. आरोपीने गुन्हा नाकबूल केल्याने तपासी अंमलदार फिर्यादी, पंचनामा व ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. त्यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. वैशाली माने यांनी सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molestation case result within 11 days in kolhapur
First published on: 20-09-2017 at 03:18 IST