राज्य शासनाच्या नियमन मुक्तीच्या निर्णयाचे स्वागत करताना ज्येष्ठ नेते  प्रा. एन. डी. पाटील यांनी त्यांना भेटलेल्या कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना, शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये माल लावायला जागा नसल्याने  गोंधळलेल्या शेतकऱ्याला निराधार करण्याऐवजी बाजार समित्यांमधील मोकळ्या जागा मालासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला दिला. शासनाच्या लक्षात  ही अडचण लक्षात आली असून, समित्या, शहरातील जागा अधिग्रहित करून त्या शेतकरी कट्टय़ासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

प्रा. पाटील यांच्या घरी जाऊन राज्यमंत्री खोत यांनी भेट घेतली. या वेळी  बाजार समिती, शेतकरी, व्यापारी व सरकारची भूमिका यांवर सविस्तर चर्चा झाली. फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याबद्दल सरकारचे कौतुक करीत प्रा. पाटील म्हणाले, आता सरकारची जबाबदारी वाढली असून नवीन वाटेवरून जाताना शेतकरी गोंधळला आहे. समितीमध्ये माल लावायचा कोठे,  विकायचा कसा, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. यासाठी समित्यांमधील मोकळ्या जागा त्यांच्यासाठी राखीव करून देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर खोत यांनी इतर राज्यांतील समित्यांमध्ये कशी व्यवस्था आहे, याच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून, समित्यांमध्ये शेतकरी कट्टा उभा करण्याचा मानस असल्याचे सांगितले. मुंबईमधील सामाजिक, गृहनिर्माण संस्थांना शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी जागा देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यानुसार बोरीबंदर महापालिकेसह व मुंबई जिल्हा बॅँकेच्या ५३ शाखांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी भगवान काटे उपस्थित होते.

हत्तीचे बळ

प्रा. पाटील यांची प्रकृती थोडी बिघडल्याने ते झोपून आहेत. भाऊ घरात येताच त्यांनी प्रा. पाटील यांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. चळवळीच्या आठवणी जागवत खोत म्हणाले, ‘‘पाटील हे चळवळींचे भीष्माचार्य आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करायची आहे . त्यांच्या दर्शनाने सरकारमध्ये काम करताना हत्तीचे बळ येणार आहे.’’