शारदीय नवरात्र उत्सवाला करवीरनगरीत शनिवारी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेले करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर सज्ज झाले आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीची सिंहासनस्थ रूपातील पूजा बांधण्यात आली. यंदा मंदिरावर रोज नव्या प्रकारची रोषणाई पाहायला मिळणार आहे. आज मंदिरांसह घरोघरी देवीची स्थापना करण्यात आली. सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यात वाजत गाजत निघाल्या. डॉल्बीचा दणदणाट होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते.

राज्यातील नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला विशेष महत्त्व आहे. यामुळे उत्सवाच्या पहिल्याच दिवशी येथे मोठय़ा प्रमाणावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. सकाळी पश्चिम देवस्थान समितीचे प्रभारी तथा जिल्हाधिकारी अमित सनी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. दुपारी श्रीपूजकांनी पहिली पूजा सिंहासनस्थ रूपातील बांधली. देशातील सुरक्षेचा विचार करून मंदिर व परिसराच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे. या भागात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, मंदिर कार्यालय व जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे त्याचे फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी पाच किलोंचे ३० फायर एिस्टगविशर्स लावण्यात आले आहेत व विद्यापीठ गेट येथे अग्निशमन गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर यंदा प्रथमच करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराला विविध रंगांची रोषणाई करण्यात आली आहे. नेहमीच्या ढाच्यातील रोषणाईऐवजी ही रोषणाई चच्रेची बनली आहे. रात्री पालखी मिरवणुकीत भाविक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, दख्खनचा राजा जोतिबा येथेही उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. जोतिबा  मंदिरासह नंदी, बद्रिकेदार, चोपडाई, काळभरव, रामिलग, दत्त आदी मंदिर, कामधेनू व ओवऱ्यांची स्वच्छता करून तेथे मंदिर परिसरातील शिखरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

प्रतिवर्षी जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे. मुख्य मंदिरात दर्शन रांगा लावण्यासाठी जादा पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे.