ना करवाढ, ना ठोस नव्या योजनेचा अभाव अशा स्वरुपातील कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्थायी समितीकडे सादर केला. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प असे मिळून ११५८ कोटी ४६ लाख रुपये जमेचा अर्थसंकल्प आहे. सी.सी. टी.व्ही. ऐवजी सेफ सिटी प्रकल्प अशी नावात रंग सफेदी करुन जुनीच योजना नव्याने आणली आहे. पर्यावरणाकडे मात्र अधिक लक्ष दिल्याचे ठळकपणे दिसते.
कोल्हापूर महापालिकेचे सन २०१५-१६ चे सुधारित व सन २०१६-१७ चे नवीन अर्थसंकल्प आयुक्तानी सादर केला. यामध्ये महसुली व भांडवली जमा ४३५ कोटी ६० लाख रुपये अपेक्षित असून खर्च ४३० कोटी ३३ लाख रुपये अपेक्षित असून शिल्लक ५ कोटी २६ लाख रुपये अपेक्षित आहे. विशेष प्रकल्पावर मोठया प्रमाणावर खर्च होणार असल्याचे ठळकपणे दिसले. या बाबीसाठी ६७४ कोटी ३३ लाख रुपये जमेसाठी अपेक्षित असून खर्च ५७६ कोटी १५ लाख रुपये अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण निधी आणि केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. यासाठी जमा रक्कम ४८ कोटी ९२ लाख रुपये अपेक्षित असून खर्च ४७ कोटी ९० लाख रुपये अपेक्षित आहे.
कोल्हापूर सेफ सिटी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ७.५ कोटी रुपये महापालिका व जिल्हा नियोजन मंडळ  यातून रक्कम खर्च करुन ६५ ठिकाणी १६५ सि. सि. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहे. हेच काम पुढे नेण्याची प्रक्रिया अंदाजपत्रक करते. या वर्षांत ६१ कि. मी. लांबीचे ऑपटिकल फायबर पोलिस मुख्यालयाशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्चामध्ये मोबाईल व्हीडीओ सव्र्हीलन्स, व्हीईकल टॅक्रीग सिस्टीम, टॅफिक सिस्टम, एम. चलन, गेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, डायल १०० या सुविधेचा समावेश आहे. महापालिकेची पाणी आकारणी स्पॉट बिलींग द्वारा केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक सुधारणा केली जाणार असून दर दोन महिन्यानी मिटर िरडींग प्रत्यक्ष जागेवर जाऊन अचूकपणे घेतली जाणार आहे. तर महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी एकच कर आकारणीचे रिव्हीजन केले जाणार आहे. त्यासाठी सॅटेलाईट इमेजचा वापर केला जाणार आहे.
महापालिकेतर्फे करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर व परिसरासाठी २५५ कोटीचा आराखडा बनविण्यात आला आहे. हे काम तुळजापूर, पंढरपूर प्रमाणे १०० टक्के शासकीय अनुदानातून व्हावे, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. वॉटर ऑडिट करुन पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी शोधणे, खराब पाईपलाईन बदलणे, पंपींग मशिनरीचा पूर्ण क्षमतेने वापर करणे यावर भर दिला जाणार आहे. महापालिकेने नागरिकांना आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकाद्वारे केला आहे. या अंतर्गत ई ऑफिस, रोड मॅनेजमेंट सिस्टिम, मोबाईल अॅप, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी फेस रेकगनिशन सिस्टिम, डिजिटल इंडिया अंतर्गत रेकॉर्ड डिजिटलायजेशन व ई हॉस्पिटल प्रणाली यावर भर दिला जाणार आहे.
पर्यावरण प्रकल्प
अंदाजपत्रकामध्ये पर्यावरण प्रकल्पावर विशेष भर दिला आहे. कसबा बावडा व दुधारी येथे ९५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, घन कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, रस्ते सफाईसाठी स्वििपग मशिन भाडे तत्त्वावर घेणे, स्वच्छ भारत अभियान धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून प्रत्येक घरी शौचालयाची सोय करणे, कचऱ्यापासून वीज निर्मिती, उद्यानाचा विकास व नागरीकरण, एल.ई.डी. पथदीप प्रकल्प यांचा समावेश आहे.