कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काँग्रेस पक्षातील उमेदवारीची स्पर्धा दुस-यांदा मुंबईत पोहोचली. सोमवारी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे या तिघा इच्छुकांनी प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन तिघांपकी कोणालाही उमेदवारी दिल्यास त्यासोबत राहणार असल्याचे एकमुखाने सांगितले. तर, स्पध्रेतील आणखी एक इच्छुक सतेज पाटील उमेदवारीच्या धामधुमीतही तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाला गेले असून ते उमेदवारीचे साकडे घालणार असल्याचे सांगण्यात येते.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातील एका जागेसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार असून जिल्ह्याचे राजकारण या निवडणुकीभोवती गुंफले गेले आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चांगलाच खल होत असून त्यासाठी लॉबिंगही सुरू झाले आहे. आमदार महाडिक, पी.एन.पाटील, आवाडे या तिघांनी रविवारी एकत्रित येऊन परस्परांना ताकद देण्याचा निर्णय घेत सतेज पाटील यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. याचे पुढचे पाऊल सोमवारी मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात टाकले गेले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, डॉ.पतंगराव कदम या वरिष्ट नेत्यांची तिघांनी भेट घेतली. या वेळी महाडिक, पाटील, आवाडे यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र देण्यात आले असून त्यामध्ये आमच्यापकी कोणालाही उमेदवारी दिल्यास उमेदवार निवडून आणू, असे म्हटले आहे. यावेळी आवाडे यांनी स्वतंत्र पत्र दिले असून त्यामध्ये इचलकरंजीतील सत्तारुढ व विरोधक ६२ मतांचा गठ्ठा आपल्या पाठीशी असल्याने व आपण अन्य उमेदवारांत सीनियर असल्याने उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे सतेज पाटील यांनी सोमवारी तिरुपती बालाजी येथे सहकुटुंब दर्शन घेतले. तिकडे जाण्यापूर्वी त्यांची पी.एन.पाटील व आवाडे यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास सोबत असल्याचे त्यांनी आपणास सांगितले असल्याचे सतेज पाटील यांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षातील उमेदवारीबाबत गटा-तटाचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने वाहत आहे हे कळणे कठीण आहे.