कामगार नेते गोिवद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाची सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेली आरोप निश्चितीबाबतची सुनावणी पुढील सोमवार (१० ऑक्टोबर ) पर्यंत तहकूब करण्यात आली. संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीसाठी मुंबई उच्च न्यायालयात सात ऑक्टोंबर रोजी आरोपनिश्चितीबाबत अंतिम सुनावणी होणार आहे. तेथील निर्णयावर जिल्हा न्यायालयातील सुनावणी अवलंबून आहे. पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या वकिलांनी दाखल केलेल्या दोन अवमान याचिकांपकी एकावर  सप्टेंबर, तर दुसऱ्या याचिकेवर ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात एसआयटीने अटक केलेला संशयित  गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित आहे.   पानसरे कुटुंबीयांनी समाधानकारक तपास न झाल्याने समीरवर आरोप निश्चिती करू नये, अशी मागणी  मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या खटल्याची सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी गायकवाडचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी आज न्यायालयात केली. यावर न्यायाधीश एल. डी. बिले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणी १० ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलली.

पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला पोलिसांनी भेटू न दिल्याने, तसेच ओळख परेड न करताच प्रसारमाध्यमांना छायाचित्र काढू दिल्याबद्दल त्याचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पोलिसांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर पार पडली. सरकारी पक्षाकडून दिलेल्या पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी मुदत मागितली आहे.