कोल्हापूर जिल्ह्यात गावोगावी जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापत चालले असताना पोलिसांनी कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी सराईत गुंड, संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. धमकावणे, हाणामारींच्या घटना टाळण्यासाठी १०० पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे, तर १३४३ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

निवडणुकीच्या आचारसंहितेचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक विभागाचे आयुक्त जे. के. सहारिया हे कोल्हापुरात आले होते. तेव्हा त्यांनी निवडणूक सुरळीत व भयमुक्त पार करण्याची सूचना केली होती. त्याची दाखल घेत पोलिसांनी सदर कारवाईला सुरुवात केली आहे. अधीक्षक महादेव तांबडे यांनी जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हे घडण्याची शक्यता आहे, अशा संभाव्य १५६१ लोकांपकी १३४३ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

१०० पेक्षा अधिक लोकांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवले आहे. ते काही दिवसांत प्रांत कार्यालयातून मंजूर होतील. ११० प्रमाणे ७० जणांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात ११८ गावे उपद्रवी आहेत. त्यामुळे अशा गावांवर विशेष लक्ष राहणार आहे. करवीर, कागल व हातकणंगले येथील गावांचा यात समावेश आहे. तेथील पोलीस अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावात पोलीस अधिकाऱ्यांनी दिवसातून एकदा फेरी मारून परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.

कारवाई कागदोपत्री की कृतिशील?

कोणतीही मोठी निवडणूक प्रक्रिया की पोलिसांना गुंड तडीपार करण्याची आठवण येते. अन्य वेळी यातील अनेक जण बिनदिक्कत सर्वत्र फिरत असतात. यातील अनेकांचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची उघड चर्चा आहे. कोल्हापूर महापालिका तसेच अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवेळीही पोलिसांनी अनेकांना तडीपार केले होते. त्यातील काही जण शहरात बिनदिक्कत फिरत होते, तर काही जण प्रचार करत असल्याची छायाचित्रे समाज माध्यमात झळकत होती. पण त्यांच्या बकोट्याला हात लावण्याचे धाडस न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. हा अनुभव पाहता या निवडणुकीवेळी तरी गावगुंडांना खरेच तडीपार करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ कागदोपत्री कारवाई नको, अशी मागणीही केली जात आहे.