पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यासह तिघांवर गोळीबार करुन जखमी केल्याप्रकरणी कुंडलिक गणपती कुंभार (वय ६३ रा. कोडोली. ता. पन्हाळा, कोल्हापूर) यास जिल्हा सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी शुक्रवारी चार वष्रे सक्तमजुरी व तीन हजारांचा दंड सुनावला.

कुंडलिक कुंभार यांनी २००५ साली कोडोली जनता ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कोडोली यांच्याकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र काही कारणास्तव कुंभार यांनी या कर्जाची परतफेड केली नाही. सन २००९ पर्यंत कर्जाची रक्कम थकून १ लाख ९३ हजार रुपये इतकी झाली. पतसंस्थेने कुंभार यांना वेळोवेळी कळवूनही कुंभार यांनी ही रक्कम भरली नाही. पतसंस्थेने सहायक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांच्याकडून कुंभार यांच्यावर जप्तीचा आदेश मिळविला.

यानुसार पतसंस्थेचे वसुली अधिकारी भगवान दिनकर जाधव, बाबासाहेब कवठेकर, लिपीक विनयकुमार नाळगोंडा हे २० जून २०१२ रोजी कुंभार यांच्या घरी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी गेले होते. या वेळी कुंडलिक कुंभार याने, मी तुमच्या बँकेचे कर्ज घेतले नाही, कुठले कर्ज असे वसुली अधिकाऱ्यासह लिपीकास दरडावणी केली. घरात जाऊन घरातील बंदूक आणून  तुम्हाला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देऊन बंदुकीतून दोन गोळ्या झाडून तिघांना जखमी केले. यानंतर याबाबतची फिर्याद लिपीक नाळगोंडा यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली होती.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. बाबासाहेब कवठेकर व भगवान जाधव, सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष ग्राह्य धरण्यात आल्या. साक्षीदारांची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.