मिरज-सांगली रस्त्यावरील बेथेलनगरमध्ये सापडलेली ३ कोटींची रोकड ही बेनामी संपत्ती समजून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेत असलेला तरूण मोहद्दीन मुल्ला याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी न्यायालयाने दिले.
शनिवारी पत्र्याच्या घरात सापडलेली ३ कोटी ७ लाख ६२ हजार ५०० रूपयांची रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली याचा तपास अद्याप पोलिसांना लागलेला नसला तरी याबाबत सक्त वसुली संचालनालयासह प्राप्तिकर विभागाला अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित तरूण मोहिद्दीन अबुबकर मुल्ला या तरूणाकडे नवीकोरी बुलेट आढळल्याने संशयावरून हे घबाड पोलिसांच्या हाती लागले.
शनिवारी ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रूपयांची बेनामी रोकड पोलिसांच्या हाती लागली. याप्रकरणी मुल्ला या पन्हाळा तालुक्यातील जाखलेचा रहिवासी असून त्याच्याकडे पोलिसांनी रात्रीपासून कसून चौकशी सुरू केली आहे. मात्र या रकमेबाबत तो ठोस माहिती देण्याऐवजी विसंगत उत्तरे देत असल्याने निश्चित दिशा अद्याप प्राप्त झालेली नाही.
झोपडीवजा पत्र्याच्या घरामध्ये सुटकेसमध्ये हजार व पाचशे रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम आढळून आली. संशयित मोहद्दीन मुल्ला हा बदली वाहन चालक म्हणून काम करणारा तरूण असून त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, हा प्रश्न चक्रावून टाकणारा आहे.
तीन कोटींची रोकड ही हवाला व्यवहारातील असल्याची शक्यता असून गोव्यातून ही रोकड मिरजेत आली असल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू आहे. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.