भाजपाच्या कार्यकारिणी बठकीत मीच मुख्यमंत्री राहणार असे विधान करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून बोलावणे आले तर त्यांची त्याला नाही म्हणायची हिंमत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या राजकीय मर्यादांवर टीका केली. येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी फडणवीस  सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असून त्यांनी शेतकऱ्यांना रांगेत उभे केल्याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर विविध मुद्दय़ांवरून टीकेची झोड उठवली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त सद्भावना दौड आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सरकारच्या धोरणावर त्यांनी टीकास्त्र सोडले.

भाजप कार्यकारिणी बठकीत फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीवर हल्ला चढवला होता. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांच्या  त्या भाषणामधून सरकारच्या अपयशाचा तणाव स्पष्टपणे जाणवत होता, असा उल्लेख केला. राज्य सरकारने आता केलेली कर्जमाफी फसवी असून आपण त्यावर समाधानी नसल्याचे नमूद करून चव्हाण म्हणाले, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कोणत्याही अटी शिवाय लागू करण्याचे आश्वासन भाजपन दिले असल्याने त्याबाबत आता शेतकरी आणि विरोधकांनी विचारणा केली तर  चुकले कोठे , असा खोचक सवाल त्यांनी केला.

कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही राज्यात चारशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत गेल्या सात दिवसात ३४ शेतकऱ्यांच्या  आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे भाजपा सरकारबद्दल  शेतकऱ्याच्या मनात भरोसा नाही, हे उघड झाले असून फडणवीस यांच्या विषयी शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. हे सरकार बिनबुडाचे आरोप करून विरोधकांना बदमान करत आहे. रोजगार निर्मितीबाबत सरकारकडून केला जाणारा दावाही खोटा असल्याचे ते म्हणाले.  मराठा समाजाच्या तोंडालाही या सरकारने पाने पुसली असून फक्त फसव्या जाहिरातींवर सरकारचा भर असल्याची टीकाही त्यांनी केली. फडणवीस सरकारच्या काळात मलईदार पोिस्टगसाठी सुपर बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला. सनातन संस्थेबद्दलची भूमिका काय हे सरकारने स्पष्ट करण्याचे  आवाहन चव्हाण यांनी केले.