कडक उन्हामुळे पार ४० अंशांवर गेल्याने कासावीस झालेल्या कोल्हापूर, इचलकरंजी भागातील लोकांना आज सायंकाळी आलेल्या तुरळक पावसाने का होईना हलकासा दिलासा दिला. वळवाच्या पावसाने लावलेल्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला, पण हा आनंद
टिकण्यापूर्वीच पुन्हा घामाच्या धारा वाहू लागल्या.
संपूर्ण मे महिन्यात तापमानात वाढ होत चालली आहे. तीन दिवस तर करवीरनगरीचा पारा ४० अंशांच्या पुढे जात आहे. दुपारी तर जीव नकोसा वाटावा असा उष्मा असतो. आज सायंकाळी सहा वाजता पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. १५-२० मिनिटे पडलेल्या पावसाने रस्ता तेवढा ओला झाला. हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. आज दिवसभर ढगाळ हवामान होते. वारेही वाहात होते, यामुळे जोरदार पाऊस पडेल असे वाटत होते. पण पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने अनेकांची निराशा झाली.