सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिल्याचा पश्चाताप होत आहे. याबाबत नेमके काय केले पाहिजे, याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणी बठकीत घेण्यात येणार आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सत्तेतून बाहेर पाडण्याचे संकेत दिले.

शेतकरी संपाच्या मुद्यांवर शेट्टी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय भाजप घेऊ शकत नाही. भाजप हा विद्वानांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशाने हे सरकार नक्कीच अडचणीत येईल. शेतकऱ्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे, असे शेट्टी म्हणाले. हा संप सात दिवसांचा आहे, मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालू राहील, असा इशारा खासदार शेट्टी यांनी भाजप सरकारला दिला आहे.

खोत यांना जाब विचारू – शेट्टी

संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी स्वाभिमानीचा बिल्ला छातीवर लावून लुडबूड करणारे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेच्या कार्यकारिणीसमोर बोलावून जाब विचारला जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मिरजेत सांगितले.

खोत यांच्याकडून समर्थन

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. काही मंडळींना हे आंदोलन मिटू नये असे वाटत असून ते यामधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप खोत यांनी केला.