चालू वर्षी उसास विनाकपात ३२०० रुपये प्रति टन पहिली उचल देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे आयोजित ऊस परिषदेत केली. तसेच हा दर न देणाऱ्या कारखान्यांविरोधात ‘स्वाभिमानी’तर्फे आंदोलनाचा इशाराही या वेळी त्यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज जयसिंगपूर येथे पंधराव्या ऊस परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस कृषी आणि फलोत्पादान राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की कृषी मूल्य आयोगाने यंदा मागील वर्षांएवढीच ‘एफआरपी’ सुचवली आहे. परंतु यंदाचे उसाचे घटते उत्पादन आणि त्यामुळे साखरेचे वाढते दर, तसेच इतर उपपदार्थ निर्मिती उत्पादनांनाही मिळत असलेला चांगला बाजार पाहता कारखान्यांनी उसास पहिली उचल म्हणून प्रति टनास ३२०० किमान दर द्यावा. हा दर न देणाऱ्या कारखान्यांना शेतक ऱ्यांनी त्यांचा ऊस घालू नये. स्वाभिमानी संघटना या कारखान्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांना हा किमान दर देणे भाग पाडेल.

या दराची मांडणी करताना ते म्हणाले, की ऊस उत्पादनावरचा खर्च वाढला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे या शेतक ऱ्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होऊन ते घटले आहे.

दुसरीकडे ऊस उत्पादन घटल्यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शेतक ऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना तसेच त्यांचे उत्पादन घटत असताना साखरेच्या वाढीव दराचा फायदा कारखान्यांनी शेतक ऱ्यांना द्यावा. या सर्व गोष्टींचा विचार करूनच यंदा सर्व कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन ३२०० रुपये विनाकपात द्यावी. जे कारखाने हा दर देणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध ‘स्वाभिमानी’तर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

या वेळी खोत यांनी, सत्तेत असलो तरी शेतकऱ्यास विसरलेलो नाही म्हणूनच या परिषदेस आल्याचे सांगितले. या सरकारची, त्यातील सहभागी मंत्र्यांची ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा अशी इच्छा आहे. राष्ट्रावादीची साखर कारखानदार मंडळीच हा दर देत नाहीत. पण आता ठरलेला दर न दिल्यास मुख्यमंत्री त्यांना तो देण्यास भाग पाडतील असेही ते म्हणाले.

अजित पवारांवर टीका करताना खोत म्हणाले, त्यांच्या तालुक्यातील विरोधी गटाकडे असलेला कारखान्याने २८०० रुपये प्रति टन दर दिला आहे. तो दर अजित पवार यांनी द्यावा आम्ही त्यांचा सत्कार करू.

कारखाना विक्रीत मोठा गैरव्यवहार

राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने हे या साखर सम्राटांनी कवडीमोल भावाने खासगी कंपन्यांना विकले. या सर्व व्यवहारांविरुद्ध आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. या व्यवहारात मोठा गरव्यवहार झाला असल्याची टीका शेट्टी यांनी या वेळी केली.