इचलकरंजीतील शिवाजीनगर परिसरातील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासंदर्भातील ठराव करण्यास नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांचेकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या गरसमजुतीमुळे आंदोलक महिलांनी त्यांना घेराव घातला. काही तांत्रिक बाबींमुळे या सभेत सदरचा विषय घेता न आल्याने पुढील सभेत निश्चितपणे ठराव केला जाईल अशी ग्वाही बिरंजे यांनी यावेळी दिली.

शिवाजीनगर बावणे गल्ली परिसरातील देशी दारू दुकान स्थलांतरित करावे, या मागणीसाठी भागातील महिलांनी २ मे पासून आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात नगरपालिकेने ठराव करून द्यावा अशी मागणी भागातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा बिरंजे यांच्याकडे केली होती. मात्र तत्पूर्वीच सभेची विषयपत्रिका व ऐनवेळचे विषय तयार झाल्याने सदरचा विषय विषयपत्रिकेत घेता आला नाही. आज सभा असल्याने या संदर्भातील ठराव व्हावा या मागणीसाठी भागातील महिलांनी पालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला होता.

सभेच्या प्रारंभी दारू दुकान स्थलांतरित करण्याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली. परंतु हा विषय कायदेशीर असल्याने त्यावर सविस्तर चर्चा करून पुढील सभेत ठराव करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा बिरंजे या बाहेर जात असताना आंदोलक महिलांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर नगराध्यक्षांनी चर्चा करण्यास दालनात येण्यास सांगितले. त्या ठिकाणी नगराध्यक्षांच्या भागातील विषय असूनही आणि वारंवार माहिती देऊनही त्या आंदोलनात सहभागी होत नाहीत. भागातील नागरिकांना विशेषत महिला वर्गाला होणारा त्रास त्यांना दिसत नाही का, असे सवाल उपस्थित करण्यात आले.

त्यावर नगराध्यक्षा बिरंजे यांनी, गत वीस वर्षांपासून आपण या भागाचे नेतृत्व करीत आलो असून अनुचित प्रकार घडला असता तर आपण शांत बसलो नसतो. आंदोलकांनी मला डावलून आपल्या परीने हे आंदोलन सुरू केले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी आपण या भागातील नागरिकांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच कांही मंडळी माझ्या विरुध्द राजकीय षड्यंत्र करून माझी बदनामी करत असल्याचा आरोपही  त्यांनी केला. अखेर उपनगराध्यक्ष महावीर जैन, पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ, रवी रजपुते, भाऊसो आवळे आदींनी मध्यस्थी करीत हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असून त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेकडून लागेल ते सहकार्य करण्याबरोबर आगामी पालिकेच्या सभेत ठराव मंजूर करून दिला जाईल असे सांगितले.