उसाचे बिल एकरकमी एफआरपीनुसारच मिळावे या मागणीसाठी १६ ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार बठकीत सांगितले. म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा बोजा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढविण्यास आमचा विरोध राहील. यासाठी सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरू असा इषाराही त्यांनी दिला.
अनेक साखर कारखाने एफआरपीनुसार उस बिले हप्त्याने देण्याचे धोरण जाहीर करू लागली आहेत. मात्र या पध्दतीला स्वाभिमानीचा विरोध असून हा विरोध दर्शविण्यासाठी प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर १६ आक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. साखरेची निर्यात करण्यासाठी संघटनेने प्रयत्न केले यामुळे ४० लाख टन साखर निर्यात झाली असल्याचा दावा करून याचा लाभ उत्पादकांना मिळाला पाहिजे, असे सांगून खा. शेट्टी म्हणाले की, कच्ची साखर आयात करून ती पक्की करून निर्यात करण्यासाठी असलेली कालमर्यादा दीड वर्षांची होती. ती कमी करून सहा महिने केल्याने साखरेचा काळाबाजार रोखण्यात यश आले.
म्हैसाळ योजनेची थकित रक्कम वसूल करण्यासाठी जलसंपदा विभाग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवित आहे. या धोरणाला स्वाभिमानीचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत शासनाला ही भूमिका बदलावीच लागेल अन्यथा आम्ही सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इषाराही त्यांनी यावेळी दिला.