उकाडय़ाने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला. वळवाच्या पावसाने लावलेल्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला होता. ढग दाटून आलेल्या भागावर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर अनेक भागात केवळ हलक्या सरी बरसल्या. विजांचा कडकडाट होत राहिला. जिल्ह्यात काही तालुक्यात पावसाची हजेरी होती .
एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ होते. गेले काही दिवस करवीर नगरीचा पारा चढला आहे. दुपारी तर जीव नकोस वाटावा असा उष्मा असतो. आज सायंकाळी सहा वाजता सोसाटय़ाच्या वादळी वाऱ्यानंतर पावसाच्या हलकी सरी सुरू झाल्या. त्यानंतर सुमारे तासभर लावलेल्या हजेरीने सखल भागात पाणी साचून राहिले होते.
अचानक आलेल्या पावसाने नागरिक, व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ढग दाटून आलेल्या भागावर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर अनेक भागात केवळ हलक्या सरी बरसल्या. विजांचा कडकडाट होत असला तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने अनेकांची निराशा झाली.
सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी डिजिटल फलक तुटून पडले. जोरदार वाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण झाला होता