वन विभागाच्या चिखली (ता. करवीर) येथील रोपवाटिकेत सोमवारी मध्यरात्री सशस्त्र चोरटय़ांनी दरोडा घातला. या घटनेत चोरटय़ांनी रोपवाटिकेतील पाच टन चंदनाचे लाकूड, चंदन तेलाचे डबे असा सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरटय़ांनी सुरक्षा रक्षकासह त्याच्या पत्नीला मारहाण करीत खोलीत डांबून चोरी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिखली येथील नर्सरीची पाहणी करून करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

वन विभागाने चिखली येथील रोपवाटिकेच्या आवारात अवैध वाहतुकीतील चंदनाचे लाकूड आणि चंदनाच्या तेलाचे डबे ठेवले होते. न्यायालयाच्या आदेशाने वन विभागाच्या ताब्यात आलेला हा मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारीही वन विभागाकडे होती. वन अधिकाऱ्यांनी रोपवाटिकेच्या देखभालीसह जप्त मुद्देमालाच्या सुरक्षेसाठी वन मजुराची नियुक्ती केली होती. सोमवारी रात्री वनमजूर उत्तम निवृत्ती कांबळे (मूळ रा. मिणचे, ता. हातकणंगले, सध्या रा. अस्वले मळा, वडणगे, ता. करवीर) आणि वनरक्षक साताप्पा जाधव हे दोघे रात्रपाळीसाठी असल्याने रोपवाटिकेतील खोलीत झोपले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ जणांनी कटावणीने दरवाजा तोडून सुरक्षा रक्षकांच्या खोलीत प्रवेश केला. चोरटय़ांनी सुरक्षा रक्षक साताप्पा जाधव आणि उत्तम कांबळे या दोघांचेही हायपाय दोरीने बांधून घातले. चोरटय़ांकडे कोयते आणि काठ्या होत्या. या दोघांनीही आरडाओरडा करताच त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे घालून चोरटय़ांनी मारहाण केली. याशिवाय परिसरातील कुत्र्यांना त्यांनी मांसाच्या तुकड्यांमधून गुंगीचे औषध घातले.

चोरटय़ांनी नर्सरीतील ट्रकमधून ९ हजार रुपये किमतीचे पाच टन चंदनाचे लाकूड, ६० हजार रुपये किमतीचे चंदनाच्या तेलाचे ४ डबे आणि दीड लाख रुपये किमतीचे १०० किलो चंदनाच्या लाकडाचे तुकडे घेऊन पोबारा केला. चोरटय़ांनी सुरक्षा रक्षक आणि वन मजुराचे मोबाइलही लंपास केले. चोरटे निघून गेल्यानंतर काही वेळाने वनरक्षक जाधव आणि वनमजूर कांबळे यांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. सकाळी उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी चिखली रोपवाटिकेत जाऊन पाहणी केली,

चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांनाही डांबून घातले. चंदनाच्या लाकडांपेक्षाही किमती असलेले चंदनाचे तेल चोरटय़ांनी लंपास केले, त्यामुळे चोरटय़ांना नर्सरीतील वस्तूंची आधीपासूनच माहिती असल्याचा पोलिसांना संशय आहे. चोरटय़ांच्या शोधासाठी करवीर पोलिसांची नऊ पथके रवाना झाली आहेत, तर वन विभागानेही ४ पथके तयार करून चोरटय़ांचा शोध सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.