आर्य शिक्षण संस्थेमधील निवृत्त शिक्षक जयवंत मधाळे यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीसह पेन्शन प्रश्नी सेवा पुस्तक तत्काळ शिक्षणखात्याकडे द्यावे यासाठी आज शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फोर्ड कॉर्नरनजीक वाहतूक रोखून धरली. आंदोलकांनी सुमारे १ तासाहून अधिक काळ वाहतूक रोखून धरल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
आंदोलकांनी रास्ता रोको करत आर्य शिक्षण संस्थेच्या अधिकार्याना आंदोलनस्थळी बोलविले. संस्थेचे अधिकारी तत्काळ दाखल होत त्यांनी आंदोलकांशी रस्त्यावर बसूनच चर्चा केली. यावेळी मधाळे यांचे सेवा पुस्तक तत्काळ पाठविणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तर मधाळेंसह अन्य शिक्षकांचे प्रश्न मार्गी न लावल्यास आता शिक्षण उपसंचालक कार्यालयावर हल्लाबोल करू असा इशारा संघटेच्या वतीने प्रा. शहाजी कांबळे यांनी दिला.
जयवंत मधाळे आर्य समाज शिक्षण संस्थेच्या शाहू दयानंद व बा.  कृ. पाटील (कौलवकर) हायस्कूलमध्ये शिक्षक होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. मात्र त्यांच्या पेन्शन संदर्भातील कागदपत्रे शिक्षण विभागाकडे संस्थेने सादर केली नाहीत. सध्या मधाळे हे खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृत्ती गंभीर बनली आहे. तरीही पेन्शन संदर्भात दखल घेतली जात नाही. यामुळे संतप्त आरपीआय कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणअधिका-याना रोखून धरले होते. शुक्रवारी याच मागणीसाठी संस्थेच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी अचानकपणे रास्ता रोको केला.
रूपा वायदंडे, विलास भामटेकर, सुखदेव बुध्याळकर, एस. डी. कांबळे, बी. डी. पाटील, राम पाटील, अविनाश अंबपकर, संजय जिरगे, दिलीप कोथळीकर, ए. डी. कांबळे, गुलाब शिर्के, बी. जी. कांबळे, राजेंद्र गायकवाड, एस. एन. कडलगेकर, राहुल कांबळे, प्रताप बाबर, बाजीराव जैताळकर, रोहित मधाळे, सुरेश कुरणे आदींसह कार्यकत्रे सहभागी झाले होते
सर्वसामान्य वेठीस…
   आंदोलनकर्त्यांनी अचानकपणे रास्ता रोखून धरल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. श्रद्धानंद हॉल समोरच रास्ता रोको करत वाहतूक रोखली. यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक आयोध्या टॉकीजकडून तसेच फोर्ड कॉर्नरकडून वळविल्याने नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत होत्या.