कोल्हापूर दौऱ्यात परस्परविरोधी वक्तव्य

भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय एकत्रित बसून घेऊ, राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे, देशात निधर्मवादी तत्त्वाची हार झाली आहे, ‘काँग्रेसमुक्त भारत’ची भाषा यशस्वी होणार नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांमुळे जातीयवादी शक्तींचा उदय झाला आहे.. ही आणि अशी परस्परविरोधी विधाने आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची. नुकत्याच झालेल्या त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ नेते पवार यांनी अशी ही मते व्यक्त केल्याने एकूणच त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय वाटचालीबाबत मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. खरे तर हा असा संभ्रम निर्माण करण्यात पवार पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत.

भाजप सरकारकडून पद्मविभूषण हा देशाचा सर्वोच्च मानाचा दुसरा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार कोल्हापुरात येत होते. यातच या दरम्यान शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेकडेही सगळय़ांचेच लक्ष लागले होते. भरगच्च कार्यक्रम असलेल्या या दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे पवारांनी सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल अनेक मते मांडली. यातही भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय एकत्रित बसून घेऊ असे सांगतानाच पवारांनी याच कोल्हापूर दौऱ्यात निधर्मवादाचा सूर आळवला, कुठे काँग्रेसची स्तुती करतानाच कुठे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेत्यांना अगदी मूर्खही ठरवले.

विधानामध्ये संदिग्धता

राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा विचार नाही, असे सांगत भाजपपासून बाजूला राहण्याचे संदेश द्यायचे नि लगेचच याबाबतचा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, असे नमूद करत आपल्या नेमक्या भूमिकेविषयीची संदिग्धता कायम ठेवायची. ‘इतरांच्या घरात डोकावून पाहू नका,’ अशा शब्दात कानउघाडणी करायची, पण नंतर स्थानिक पातळीवर काहीशी मोकळीक असणार, असेही सांगत गोंधळ वाढवायचा; नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील खर्चाबाबत नाराजी व्यक्त करतानाच तो उमेदवार समोर आल्यावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव करायचा.. पवारांची ही सारीच कृती सगळय़ांनाच बुचकळय़ात टाकणारी होती. अगदी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही यातून पवारांची आणि पक्षाची नेमकी दिशा कोणती याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. पवारांची अनेक विधाने कोडय़ात टाकणारी असतात. त्याचे सरळ अर्थ निराळे आणि त्यातील छुपे कार्यक्रम वेगळे असतात. त्यांच्याबाबतचा हा अनुभव कोल्हापूरकरांनी या दौऱ्यात घेतला.

खरे तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांचा दौरा म्हणजे, पक्षीय बेरजेचे राजकारण ठरलेले असते. पण यंदा अशी ‘बेरीज’ करण्यापेक्षा त्यांना स्वपक्ष सांभाळण्यातच आपली शक्ती लावावी लागली. निधर्मीवादाचा पुरस्कार करणाऱ्या पवारांच्या पक्षातीलच अनेक नेत्यांचे भाजपशी छुपे संबंध आहेत. याचे पडसाद कोल्हापुरातील या कार्यक्रमात वारंवार उमटले. यातून तत्त्व आणि राजकीय गरज सांभाळता सांभाळता त्यांनाही अनेक ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागल्याचे पाहावे लागले. काँग्रेस आघाडीसाठी प्रयत्न करणारे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपशी आघाडीसाठी आसुसलेले खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर आणि निवेदिता माने. पक्षातच निर्माण झालेली ही दरी, जाहीर वाद मिटवता मिटवता संतप्त पवार म्हणाले, ‘इतरांच्या (भाजप) घरात डोकावून पाहू नका,’ पण लगेच ‘स्थानिक पातळीवर काहीशी मोकळीक असणार,’ असे सांगत दोन्ही बाजूंना आपलेसे केले. अनेक ठिकाणी तर हे कार्यकर्ते, पक्ष सांभाळणे आहे की अन्य पक्षांशी जुळवून घेणे याचाही गोंधळ उडत होता. यातून कार्यकर्त्यांमधील संभ्रम, गोंधळ मात्र अजून वाढला आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात कायम एक गूढ राहिले आहे. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या भूमिकेचा अर्थ लावण्यावरून राजकीय अभ्यासकातही अनेकदा गोंधळ उडालेला दिसतो. त्याची जाहीर भूमिका एक असते आणि कृती भलतीच, अशीही मल्लिनाथी अनेकदा केली जाते. पवार यांचा ताजा कोल्हापूर दौराही याला अपवाद नव्हता.