कोल्हापूर महापालिकेच्या भ्रष्ट, निष्क्रिय कारभारामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे एका युवकाचा बळी गेला. या प्रकारचा निषेध नोंदवत सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिकेत प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. शहराच्या रस्त्यांमध्ये सुधारणा न घडल्यास काळे फासण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंतिक खराब झाले आहेत. यामुळे लहानसहान अपघात नित्याची बाब बनली आहे. गेल्या आठवडय़ात व्हीनस कॉर्नर येथे एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर महापालिकेच्या बेभरवशाच्या कारभारावर तीव्र टीका सर्व पातळय़ांवरून होऊ लागली. याच प्रकाराला आज शिवसेनेने वाचा फोडत महापालिकेत आंदोलन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुग्रेश िलग्रस यांच्या नेतृत्वाखाली शिवसनिकांनी आंदोलन केले. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले.

आयुक्त पी. शिवशंकर यांनाही पालिकेच्या कामकाजातीळ भ्रष्ट साखळीत अडकवले गेल्याची भीती या वेळी व्यक्त करताना आयुक्तांनी खराब रस्त्यामुळे बळी गेल्याने त्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. शहरातील रस्ते एक वर्षही टिकत नसल्याने त्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

बल गेला झोपा केला

खराब रस्त्यामुळे एका युवकाला हकनाक जीव गमवावा लागल्याने नागरिकांतून महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर टीकेचा भडिमार होऊ लागला. शिवसेनेसह अन्य पक्ष आंदोलनाच्या तयारीला लागल्यावर महापौर हसीना फरास यांच्यासह महापालिकेच्या सुस्त यंत्रणेला जाग आली. सोमवारी महापालिकेच्या भरगच्च पथकाने शहरात फिरून खराब रस्त्यांची पाहणी केली. या वेळी अनेकांनी पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.