शिवसेनेच्या निर्णायक मतामुळे काँग्रेसचे नेजदार विजयी

भाजप-शिवसेनेतील ताणलेल्या संबंधाचा फटका मंगळवारी भाजपाला स्थायी समिती सभापती निवडीवेळी बसला. सभापती निवड समान मतसंख्येवर असताना शिवसेनेच्या नगरसेविका या मातोश्रीच्या आदेशाने काँग्रेस उमेदवार डॉ. संदीप नेजदार यांच्या पाठीशी राहिल्याने भाजपचे उमेदवार आशिष ढवळे यांना एका मताने पराभूत व्हावे लागले. घोडेबाजार करूनही भाजपचा हातातोंडाशी आलेला यशाचा घास शिवसेनेने काढून घेतला. शिवाय, शिवसेनेची औकात काय असते ते दाखवून दिले, असे सांगत सेनेचे शहर प्रमुख दुग्रेश िलग्रस यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ४० वे सभापती म्हणून डॉ. संदीप विलास नेजदार, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वहिदा फिरोज सौदागर तर उपसभापतिपदी छाया उमेश पोवार यांची निवड आज महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बठकीत करण्यात आली. जिल्हाधिकारी अमित सनी हे या बठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडीसाठी सत्तारूढ काँग्रेस- राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. सत्तारूढ गटाकडे ८ , विरोधकांकडे ७ व शिवसेनेकडे १ सदस्य संख्या होती. या संधीचा फायदा घेण्याचे भाजपने ठरवले. त्यासाठी घोडेबाजाराची तयारी केली. काँग्रेस नगरसेविका रिना कांबळे यांना फोडल्याची तक्रार काँग्रेसचे गटनेते   शारंगधर देशमुख यांनी केली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षादेश लागू केला. रिना कांबळे या अज्ञातवासात असल्याने त्यांच्या घरावर पक्षादेशाची प्रत चिकटविण्यात आली होती. त्यामुळे त्या स्थायी समिती सभापती निवडीसाठी उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारास मत देतात की अन्य भूमिका घेतात यावर सभापतिपदाचे भवितव्य अवलंबून होते. पण, या निवडी वेळी त्या गरहजर राहिल्या.  यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले. गतवर्षीच्या निवडी वेळी शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले गरहजर राहिल्या होत्या. आज त्यांनी नेजकर यांना मतदान केल्याने काँग्रेसचा विजय सुकर बनला, तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांचे गणित फसले. नेजदार यांना ८  मते तर आशिष ढवळे यांना ७  मते पडली. संदीप नेजदार यांना सर्वाधिक ८ मते पडल्याने त्यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्याचे जिल्हाधिकारी सनी यांनी घोषित केले. नूतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.३, कसबा बावडा हनुमान तलाव या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले असून ते आमदार सतेज पाटील यांचे समर्थक मानले जातात.