नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच उतरणार असून आमच्या विचारांशी जुळणाऱ्या स्थानिक आघाड्यांशी हातमिळवणी केली जाईल. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत आघाडी केली जाणार नसल्याचे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी शुक्रवारी सांगितले. सेनेची जिल्ह्य़ातील नगराध्यक्षसह सर्व ६२ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.  ते म्हणाले, भाजपाबरोबर आम्ही िहदुत्वाच्या मुद्यावर युती केली होती. पण आज भाजपा िहदुत्वापासून दूर जात आहे. विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेला संपवायला निघाले होते. परंतु तरीही आमचे ६३ आमदार विजयी झाले होते. शिवसेनेचा कार्यकर्ता, आमदार, खासदार इतर कोणत्याही पक्षापेक्षा समर्पित असून आगामी नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढताना उत्साहाने कामाला लागला आहे.

इचलकरंजीमध्ये ज्यांना सेनेतून जायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजा उघडा असल्याचे सांगत दुधवडकर म्हणाले, इचलकरंजी नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे उमेदवार असून स्थानिक पातळीवर चच्रेअंतीच उमेदवार निश्चित केला जाईल. सेनेचे किमान १० उमेदवार  विजय मिळवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्यात भाजपशी युती असताना नगरपालिका निवडणुकीत या निर्णयामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही काय, याबाबत पत्रकारांनी छेडले असता दुधवडकर म्हणाले, जनतेवर पुन्हा निवडणूक लादायची नसल्याने शिवसेना सत्तेत सहभागी आहे. मात्र अडीच वर्षांच्या कालावधीतही भाजपची नीती शिवसेनेला अडचणीत आणणारी राहिली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.