चालू वर्षीच्या उसाला एफआरपीप्रमाणे एकरकमी दर मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शुक्रवारी मुरगूड येथे ‘रास्ता रोको’ तर हातकणंगले येथे मोर्चा काढण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले मिळावीत, यासाठी शिवसेनेने आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून प्रादेशिक साखर सहसंचालक रावळ यांना घेराव घालण्यात आला होता. या आंदोलनानंतर शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. या अंतर्गत शुक्रवारी जिल्हय़ात दोन ठिकाणी शिवसनिकांनी आंदोलन केले.
निपाणी-मुधाल तिठ्ठा या राज्यमार्गावर शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सुमारे तासभर या वेळी शिवसैनिकांनी उसाला एफआरपीप्रमाणे एकरकमी दर मिळालाच पाहिजे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांनी ऊस घालवल्यानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावार बिले दिलीच पाहिजेत, अशी मागणी जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे यांनी केली. शेतकऱ्यांची लूट करणा-या कारखानदारांचा धिक्कार असो, ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मागणीचे निवेदन साखर सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील यांना दिले.
आंदोलनात माजी आमदार संजय घाटगे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, अरिवद बुजरे यांच्यासह शिवसनिक व शेतकरी सहभागी झाले होते.
दरम्यान, हातकणंगले येथे शिवसेनेच्या वतीने याच मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली भगवे झेंडे घेतलेले कार्यकत्रे जोरदार घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर आले. तेथे एफआरपीच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.