अबकारी कराला विरोध करण्यासाठी बंदमध्ये सहभागी झाल्याने दुसऱ्या दिवशीही, गुरुवारी येथे सराफ बाजारात शुकशुकाट होता. यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर आता परिणाम होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना यासंबंधी निवेदन देण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे. त्याची अंमलबजावणीही लगेच सुरू केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी जेम्स अँड ज्वेलरीच्या या शिखर संघटनेच्या आदेशाने जिल्ह्यातील सराफ बाजार बुधवारपासून तीन दिवस बंद आहेत. आज गुरुवारी बंदचा दुसरा दिवस. यामुळे पूर्ण सराफ बाजारात शुकशुकाट जाणवत आहे. अंगडिया सíव्हस, सोने-चांदीचे दागिन्यांचे स्थानिक पातळीवर होणारे व्यवहारही थंडावले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना निवेदन देण्यासाठी सराफ संघाच्या कार्यालयात बठक झाली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. अबकारी करामुळे सराफ व्यवसायावर कसा दूरगामी परिणाम होणार आहे, याचे विवेचन असणारे निवेदन खासदार बाहेरगावी असल्यामुळे व्हॉट्स अॅप करण्यात आले. त्या अगोदर त्यांच्याशी फोनवर निवेदन वाचून दाखविण्यात आले.