ऊसतोड मजूर महिलेचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तसेच धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी इचलकरंजी येथे उघडकीस आली. संगीता रंगनाथ गायकवाड (वय २८, रा. खालापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना) असे तिचे नाव आहे. जुना चंदूर रोड परिसरातील दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस शेतात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच तिचा खून केला असावा, असा शिवाजीनगर पोलिसांचा अंदाज आहे. खुनाच्या घटनेनंतर पती रंगनाथ हा फरार आहे.
जुना चंदूर रोड परिसरात डॉ. संजीवनी पाटील यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात ऊसतोडीसाठी मजुरांची टोळी नोव्हेंबर २०१५पासून वास्तव्य आहे. या टोळीतील रंगनाथ गायकवाड व त्याची पत्नी संगीता हे दोघेही राहण्यास होते. त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी रात्री संगीता हिला दवाखान्यात नेतो असे सांगून रंगनाथ घेऊन गेला होता. आज सकाळी त्यांचा मुलगा चेतन रडू लागल्याने टोळीचा मुकादम रामनाथ त्र्यंबक बरडे याने गायकवाड दाम्पत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. खोपटापासून काही अंतरावरच शेतात त्यांना संगीता हिचा मृतदेह आढळून आला. संगीता हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून नायलॉनच्या दोरीने गळा आवळण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर संगीताच्या मान, पोट, मांडी आदी भागांवर सुमारे २४ पेक्षा अधिक वार केल्याचे निष्पन्न झाले. निर्जन झुडपात संगीताचा खून करून मृतदेह शेतात आणून टाकल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोउनि युवराज सूर्यवंशी आदींनी भेट देऊन माहिती घेत तपासाबाबत सूचना केल्या.