पाटील, मुश्रीफ यांची टीका

शेतीच्या प्रश्नात राजकारण करू नका असे आक्रमकपणे सांगणारी स्वाभिमानी संघटना सत्तेत आल्यावर मात्र सोयीची भूमिका घेत असल्याचे बुधवारी दिसून आले. शेतकरी आठवडी बाजाराचे सातत्याने समर्थन करणारे कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अखत्यारीतील विभागाच्या वतीने करवीरनगरीत होणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या प्रारंभ कार्यक्रम पत्रिकेतून काही आमदारांना वगळण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमातील या पंक्तिप्रपंचावरून राजकारण सुरू झाले या प्रकारावर  उल्हास पाटील व हसन मुश्रीफ या आमदारांनी टीका केली आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला चार पसे अधिक मिळावेत आणि ग्राहकांना स्वस्त दरात ताजा शेतीमाल मिळावा या संकल्पनेतून शेतकरी आठवडी बाजाराला राज्यात सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा, मोठे शहर, तालुका येथे संत सावता  माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पणन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत कोल्हापुरातील पहिला शेतकरी आठवडी बाजार शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी येथील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ सुरू होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह तिन्ही खासदार, काही आमदार, वरिष्ठ अधिकारी यांचा निमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख आहे, पण राज्य शासनाच्या कृषी, पणन विभागाच्या या पत्रिकेत  शिवसेनेचे आमदार, शिरोळ तालुक्यातील शेट्टी-खोत यांचे जवळचे सहकारी उल्हास पाटील, सेनेचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर यांना त्यातून वगळले आहे. ही बाब आज पत्रकार परिषदेत संयोजक अधिकाऱ्यांना विचारली असता त्यांनी बोलण्याचे टाळले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजकारण सुरू केल्याचा वास येऊ लागला आहे.   याबाबत आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना सत्तेत आहे  याचा कोणाला विसर पडू नये, अशी टिपणी त्यांनी करीत आपला इरादा व्यक्त केला, तर मुश्रीफ यांनी शासकीय कार्यक्रमाचे नियोजन राजशिष्ठाचारानुसार झाले पाहिजे, असे म्हणत सर्व लोकप्रतिनिधींना सामावून घेणाऱ्या नवीन पत्रिका काढून कार्यक्रम घेण्याची मागणी केली. दरम्यान खोत यांना याबाबत विाचरले असता कार्यक्रम पत्रिकेवरील चूक लक्षात आली असून नव्याने पत्रिका तयार केल्या असून त्या वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.